Thursday, November 7, 2013

मुलाखत-अभिनेता पुष्कर जोग


मुलाखत - अभिनेता पुष्कर जोग



# आवडतं ठिकाण ?

- स्वीझेर्लंड 

# आवडता पदार्थ ?

 - बटर चिकन,वरण भात. 

# पुष्कर तुझ्या अभिनय प्रवासाची सुरवात कशी झाली ?

- मी child artist म्हणून माझ्या अभिनय प्रवासाला सुरवात केली "राजू" हा माझा पहिला चित्रपट,त्यानंतर वाजवू का,रावसाहेब,साखरपुडा,सून लाडकी सासरची अश्या चित्रपटात भूमिका केल्या,मग अभिनयात काही काळ विश्रांती घेऊन डॉक्टरेट पूर्ण केल,आणि मग जबरदस्त या महेश कोठारे दिग्दर्शित चित्रपटातून नायक म्हणून मराठी चित्रपटात काम करायला सुरवात केली. 

# तू तुझ्या पहिल्याच चित्रपटात (जबरदस्त मध्ये) सुपर हिरो म्हणून झळकलास तो अनुभव तुझ्या साठी कसा होता ?  

- हो खरतर सुपर हिरो साकारताना खूप मज्जा आली आणि बरच शिकायलाही मिळालं,ह्रितिक रोशन हा माझा आवडता हिरो त्याच दिसणं,त्याची शरीर यष्टी,नृत्य या सर्वाचा मी फार मोठा चाहता आहे.कोई मिल गया,क्रिश,धूम ३ हे चित्रपट पाहून मलाही  असच करण्याची इछ्या होती,आणि जबरदस्त या चित्रपटामुळे ती पूर्ण देखील करता आली,दिग्दर्शक महेश कोठारे यांनी मला वेळोवेळी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले त्यामुळे सुपरहिरो साकारताना मला बराच फायदा झाला,ज्यावेळी तुम्हाला एखादे साहसी दृश्य साकारायचे असते त्यावेळी तुमची शरीर यष्टी लवचिक असणे खूप महत्वाचे असते आणि नृत्य साधनेमुळे माझी शरीर यष्टी या सर्वाला अनुकूल होती,त्यामुळे त्या चित्रपटातील सर्व साहसी दृश्य मी स्वतः कोणताही डमी न वापरता केले आहेत. 

# मराठी चित्रपटात नर्तक-अभिनेता हा प्रकार फार कमी पाहायला मिळतो त्याबद्दल तुला काय वाटते ?

- हो हि स्थिती वाईट आहे,जेव्हा तुम्ही अभिनेता म्हणून जेव्हा समोर येत असता त्यावेळी तुम्ही एक उत्कृष्ठ नर्तक असायलाच हवं,आपण मराठी  सिनेमाकडे पहिले तर असे अभिनेते जवळ जवळ नसल्यात जमा आहेत,त्यामुळेच मराठी सिनेमातील अभिनेत्यांना glamour कमी मिळते. 

# पुष्कर तुझा हिंदी चित्रपट "इट्स टू मच" नुकताच प्रदर्शित झाला त्या चित्रपटाबद्दल आणि तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील ?

- मी धर्मा आणि यशराज फिल्मस चा खूप मोठा चाहता आहे,त्यांचे प्रेमावर बेतलेले सिनेमे,त्यातली सुंदर सुंदर ठिकाणं हे मला नेहमीच आवडतात  आणि तरुणांना भावेल,मनोरंजन होयील असा चित्रपट मला करायचा होता आणि तो मी केला "इट्स टू मच" या चित्रपटात हे सर्व आपल्याला पाहायला मिळेल,आणि विशेष म्हणजे अभिनयासोबतच या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील मी स्वतः केले आहे. 

# तुझे आगामी चित्रपट कोणते ?

- Don’t Worry Be Happy’(हिंदी) या सिनेमात मी राजपाल यादव,विनय पाठक सोबत दिसेन,त्यानंतर Good Buddy Gadbadi (हिंदी),सासूचे स्वयंवर आणि शिखर या मराठी चित्रपटात देखील मी मुख्य भूमिकेत आहे.

# विधार्थी कट्टा मार्फत युवकांना तू काय संदेश देऊ इच्छितोस ?

- युवकांना मी सांगेन पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे न धावता आपले ध्येय प्रथम निश्चित करा,मेहनत करा त्या ध्येयाचा पाठलाग करा.बर्याच वेळा मेहनत करून देखील अपयश येते पण खचून न जाता आपल्या ध्येयाच्या दृष्टीने वाटचाल,प्रयत्न करत राहा,यश नक्की मिळेल.

विधार्थी कट्टा या साप्ताहिकाला मुलाखत दिल्या बद्दल धन्यवाद आणि अगामी चित्रपटांसाठी शुभेछ्या !


- श्रीनिवास कुलकर्णी. 

Saturday, October 19, 2013

मुलाखत - अभिनेत्री संस्कृती बालगुडे



मुलाखत - अभिनेत्री संस्कृती बालगुडे 





संस्कृती तुझ्या अभिनय प्रवासा बद्दल सांग ?

- मी मुळची पुण्याची.,वयाच्या सातव्या वर्षापासून मी भारतनाट्यम शिकत आहे,(गांधर्व महाविद्यालयातून) भरत नाट्यमच्या चार परिक्षा दिल्या आहेत. १२वी पासून मी वेस्टर्नसुद्धा शिकत आहे. त्यानंतर मी बरेच डान्स शो केले. अरंगेत्रम केलं, कॉलेजच्या बऱ्याच स्पर्धांमध्ये सहभाग घेतला.त्यामुळे कला क्षेत्रात आवड निर्माण झाली.

पहिली संधी कशी मिळालि ?

 - मी फर्स्ट इयर मध्ये शिकत असताना मला पिंजराची ऑडिशन असल्याचं  समजलं आणि त्यांना या भूमिकेसाठी खास करून डान्सर मुलगीच हवी होती.त्यानंतर मी ती ऑडिशन दिली,निवडले गेले आणि मला पिंजारातली आनंदी साकारायला मिळाली.  ह्या मालिकेद्वारे मोठमोठ्या दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याची एक उत्तम संधी मलाह्या क्षेत्रातील माझ्या प्रवासाच्या अगदी सुरुवातीलाच मिळाली यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. ह्या कलाकारांच मार्गदर्शन , तांत्रिक बाबी व पहिलीच सीरिअल असल्याने अनेक गोष्टी शिकायला मिळताहेत.एकंदरीतच काम करताना सेट वर खूप मजा येते.

मुळात संस्कृती कशी आहे ?

संस्कृती म्हणजे मी प्रेमळ आणि इतरांची काळजी करणारी आहे,नृत्य हे माझा पहिल प्रेम आहे,मी थोडीशी लाजाळू आहे,मला चाहत्यांना स्वाक्षरी द्यायला त्यांच्या सोबत फोटो काढायला खूप आवडत.

अभिनय करताना तुला नृत्याचा फायदा होतो का ?

- हो,आज माझा जो काही अभिनय दिसतोय तो १० ते १२ वर्षांच्या माझ्या नृत्यसाधनेमुळे. मालिकेत अभिनय करताना द्यावी लागणारी expressions ह्यासाठी मला माझ्या नृत्यकलेचा फायदा होत आहे.लावणी हा कलाप्रकार सादर करतानाही शास्त्रीय नृत्याचा पाया असणं महत्वाचं ठरतं असं मला वाटतं व 'पिंजरा' तील आनंदी साकारताना मला ह्या गोष्टीचा निश्चितच फायदा होतोय.

सद्ध्या तू कोणत्या प्रोजेक्ट्स साठी काम करत आहेस ?

सद्ध्या मी माकडाच लग्न या चित्रपटात भूमिका करत आहे,त्यात मी एका माझ्या वयाच्या मुलीच्या भूमिकेत आहे,हा माझा अभिनेत्री म्हणून पहिलाच चित्रपट आहे,तसेच भूषण प्रधान यांच्या सोबत एक चित्रपट करत आहे,वेळ आल्यावर त्याबद्दल पण सांगेन.

चित्रपट आणि सिरिअल यात तुला कोणता फरक जाणवतो ?

सिरिअल म्हणजे तेथे ठराविक अश्या प्रकारचे काम केले जाते जसे कि तेच तेच लुक्स,तेच कॅमेरा angles त्यामुळे एका ठराविक मर्यादेपलीकडे नवीन काहीच शिकायला मिळत नाही,पण चित्रपट या माध्यमात अनेक नवनवीन बाबी शिकायला मिळतात.

उत्तम अभिनेत्री म्हणून समोर येण्यासाठी तू नेमके कोणते प्रयत्न करत आहेस ?

सद्ध्या अभिनय क्षेत्रात काम करत असताना मला अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत काम करण्याची संधी मिळत आहे,त्यामुळे त्यांचे काम जवळून पाहणे,त्याचे शब्दांचे उच्चार,त्यांचे चढ उतार यांचं निरीक्षण करत आत्मसात करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

धन्यवाद संस्कृती !

विद्धार्थी कट्टा साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीबद्दल धन्यवाद !
तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !

- श्रीनिवास कुलकर्णी.


दि. ९ ऑक्टो. २०१३
स्थळ : - बी एम सी सी महाविद्यालय प्रांगण.
(माकडाचं लग्न मराठी चित्रपट च्या चित्रीकरण स्थळी).


Monday, October 14, 2013

धड देव्हार्यात अन . . .

धड देव्हार्यात अन . . .  



आरश्यामध्ये चेहरा व्यास्थित असल्याचा अंदाज घेत त्यानं नुकतीच विकत घेतलेली चप्पल पायात सरकवली आणि तो घरातून मंदिराकडे जाण्यास निघाला.मंदिरात व्यास महाराजांच्या श्रीमद भागवत कथेचे कथेचे आयोजन केले होते.त्यामुळे पुढील सात दिवस वेळ अगदी सहज जाणार या भावनेन त्याचा मन सुखावत होतं,नुकताच तो सेवानिवृत्त झाला होता,दिवसभर काम करायचं सायंकाळी घर गाठायचं हे त्याचं गेल्या कित्येक वर्षांचं गणित यामुळे कोलमडल होत त्यामुळे दिवसभर स्वतःला कश्यात तरी तो रमवत असे.काही अंतर गेल्यानंतर मंदिर आले,मंदिराबाहेर कोपर्यात त्याने चप्पल उतरवली,मूर्तीला पाहून त्याने नमस्कार केला आणि कथा ऐकण्यास जाऊन बसला.दिवसभर कथा ऐकल्यानंतर पुन्हा मूर्तीजवळ येउन त्यानं श्रद्धेने हात जोडले.आणि चप्पल घालण्यासाठी तो चप्पल ठेवलेल्या कोपर्याजवळ पाहतो तर काय चप्पल गायब . . . तो प्रचंड अस्वस्थ झाला,जवळपासचा परिसर बर्याच वेळ निहाळला; मात्र चप्पल काही सापडली नाही.
आत्ताच तर घेतली होती . . .
आता पुन्हा भुर्दंड . . .
नेणार्याला काहीच कसे वाटत नसेल . . . मनातल्या मनात शिव्या देत तो जवळच कट्ट्यावर बसून राहिला . . . समोर अनेक चपला दिसत होत्या . . .
त्यातली एखादी घालून जावी  का ?
नाही . . .
नको मग त्या नेणाऱ्या मद्धे आणि आपल्या मद्धे काय फरक ?
आणि आपण स्वतःच दु:ख इतरांवर ढकलतो आहोत एवढच . . .
नाही हा विचारही मनात आणू नये . . .
लोक म्हणतात शाप्पाल गेली म्हणजे साडेसाती जाते . . . पण खरतर नवीन चापलीसाठी खर्च होतो म्हणजे साडेसाती येते. 

संध्याकाळी  दुकानात जाऊन  नवीन चप्पल खरेदी केली.घरी येउन जेवन  केलं आणि पलंगावर अडवा पडून विचार करू लागला . . . नेणाऱ्याला पण नेमकी माझीच चप्पल कशी दिसली असेल ? जरा नवी दिसली की घातली पायात.नवी चप्पल मिळाली म्हणून आनंदात असेल आता,लोकांनी खरं  लाजच सोडली आहे.चप्पल चोरावी ? काय हे दरिद्री लक्षण ?
उद्यापासून आता मंदिरात जाताना चप्पलच घालायची नाही . . . असे असंख्य विचार बराच वेळ त्याच्या मनामद्धे घोळत होते.

दुसर्यादिवशी तो पायात चप्पल न घालताच कथा ऐकण्यास गेला,व्यास महाराज आज जरासंधाचा वध हि कथा सांगत होते
"भीम हा वारंवार जरासंधाच्या शरीराचे दोन तुकडे करून फेकत असे ,पण हे दोन्ही भाग एकत्र येउन पुन्हा जरासंध जिवंत होत होता,शेवटी कृष्णाने एक गवताची कडी हातात घेतली ती मधोमध चिरली आणि विरुद्ध दिशेला टाकली,समझनेवालोको इशारा काफी . . . लगेचच भीमाने जरासंधाचे दोन्ही पाय धरून,पायाकडून ताकदीने चिरून दोन्ही तुकडे विरूद्ध दिशेला फेकून दिले आणि जरासंधाचा वध झाला".
आजची कथा संपली तो घरी जाण्यास निघाला काहीतरी सुचल्याने  त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता,
नेहमीप्रमाणे त्याने जेवण आटोपले झोपी गेला.

दुसर्यादिवशी पायामध्ये चप्पल घालून तो मंदिराच्या दिशेने निघाला. 
मंदिराजवळ कालच्या जरासंधाच्या कथेत घेतलेल्या बोधानुसार एक चप्पल एका बाजूला आणि दुसरी विरुद्ध बाजूला टाकली
आणि निर्धास्त पणे कथा ऐकण्यास बसला.
काही वेळाने कथा संपली मूर्तीला त्याने नमस्कार केला आणि मंदिरातून बाहेर पडला.विरुद्ध बाजूला पडलेल्या चपला पायात घातल्या पुन्हा एकदा मंदिरातील मूर्तीकडे पाहिलं,त्याच्या चेहऱ्यावर चोराला फसवल्याचा आनंद दिसत होत, आणि मस्त शीळ वाजवत तो तिथून बाहेर पडला... पूर्ण समाधानाने!  

- श्रीनिवास कुलकर्णी. 

Wednesday, October 9, 2013

मन चिंब पावसाळी . . .

मन चिंब पावसाळी . . .

ऑफिसातल काम संपउन तो घरी आला चार घास घश्याखाली उतरवले आणि निवांत जाऊन अंथरुणावर पडला,दुसर्या दिवशी रविवार असल्याने दिवसभर आराम होयील हि जाणीव त्याला सुखावत होती,याच विचाराने केव्हा डोळा लागला त्याच त्यालाच कळल नाही . . . आणि पाहटे जग आली ती टप टप बरसणाऱ्या सरींच्या आवाजाने . . . कूस बदलून झोपण्याचा बर्याचदा प्रयत्न केला पण झोप काही लागत नव्हती . . . शेवटी ग्यालरित खुर्चीवर बसून तो पाउस अनुभवू लागला . . . टप टप आवाज करत कोसळणाऱ्या पाऊसधारा म्हणजे . . .  निसर्गदत्त संगीताची मैफिलच जणू . . . आणि ती ऐकण्यासाठी दूर वरून  गर्दी करणारे ढग . . .  प्रतिसादाची साक्ष देणारा ढगांचा कडकडाट आणि विजेच्या अवतरन्याने हे सर्व कोणीतरी टिपत असल्याचा होणारा भास  . . . पावसाच्या धाराचा  आवाज . . . कधी कोमल . . . कधी दीर्घ . . . कधी व्याकूळ तर कधी अल्लड . . .  झाडांची सळसळणारी पाने . . . त्यावर साचलेले पावसाचे थेंब . . . आडोश्याला बसलेली प्राणी,पक्षी . . . . हे सर्व चित्र अनुभवताना असताना अचानक अंगात एक शिरशिरी मनात उमटून गेली . . .  आणि पावसाचा आनंद आपण कोठेतरी हरवतो आहोत याची मनाला हूर हूर वाटू लागली . . .  वाटल मनसोक्त आनंद घ्यावा या मैफिलीचा . . .  बस्स ! ठरलं तर . . .  त्याने अंगावर कपडे चढवले,दाराला कुलूप लावलं . . . गाडी सुरु केली आणि अंग चोरत पावसाचे थेंब अंगावर झेलत तो निघाला . . .  काही वेळातच गाडीने गावाबाहेरचा रस्ता पकडला आणि हिरवळीतून त्याचा प्रवास सुरू झाला . . . तसा त्याला पाऊस प्रचंड आवडतो पण खिडकीतून . . .  खिडकी बाहेरच्या पावसाची मज्जा किती वेगळी असते हे बाहेर पडल्याशिवाय कसे कळणार ? ? ?

त्याची गाडी डोंगर दर्यांमधून वळण घेत असताना डोंगरावरून कोसळणाऱ्या समोरच्या धबधब्याकडे त्याचे लक्ष गेले . . . अहाहा ! काय ते सौंदर्य . . . उंचावरून कोसळणारे पाणी . . . पाण्यावर उमटणारे तरंग . . . त्यामुळे वर येणारे धुक्‍यांचे लोट . . . वा ! काय ते निसर्ग सौंदर्य  . . . स्वर्ग यापेक्षा का वेगळा आहे ? ? ? . . . दोन्ही डोळ्यांच्या पापण्या मिटून,पावसाचे थेंब चेहऱ्यावर झेलत त्याने आपले हात आकाशाचाया दिशेने पसरले . . . मिटलेल्या पापण्यांआड जणू काही सारी श्रुष्टी कवेत घेतल्याचा पराकोटीचं आनंद त्याला मिळत होता . . . बराच वेळ निसर्गाची हि मैफिल अनुभवत तो तेथेच बसून राहिला . . .

त्यानंतर त्याने गाडी पुन्हा घराच्या दिशेने फिरवली आणि परतीचा प्रवास सुरु केला . . . पण चेहर्‍यावर सुख होतं पावसात भिजल्याचं . . .  गाडी घरापाशी येऊन थांबली . . . तो गाडीवरून उतरला . . . समोर साचलेल्या पावसाच्या डबक्यात लहान मुले आनंदात उड्या मारत होती,होड्या करून त्या पाण्यात सोडत होती.आज पहिल्यांदा त्याला पावसाचा राग आला नव्हता,चिडचिड झाली नव्हती . . . उलट तिच्या चेहर्‍यावर समाधान होतं. कारण आज त्याने पावसासारख्या सुंदर गोष्टीला आपलंसं केलं होतं...


- श्रीनिवास कुलकर्णी.

Sunday, September 22, 2013

Amitabh Bacchan . . . अमिताभ बच्चन यांची अविस्मरणीय भेट . . .

अमिताभ बच्चन यांची अविस्मरणीय भेट . . . 

अमिताभ बच्चन यांची ‘जलसा’ या त्यांच्या निवासस्थानी झालेली भेट हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय स्वप्नवत क्षण . . . .
गेल्या २८ वर्षापासून दर रविवारी अमिताभ बच्चन साहेब आपल्या असंख्या चाहत्यांना दर्शन देतात,भेटतात.दर रविवारी सायंकाळी ६ वाजता जलसा या त्यांच्या निवासस्थानाचे दरवाजे २ मिनिटांसाठी उघडले जातात आणि त्यादरम्यान चाहत्यांना अवघ्या ३ फुटांवरून या महानायाकाचे दर्शन घडते.यासाठी आजही त्यांचे असंख्य चाहते दर रविवारी ‘जलसा’ वर हजारोंच्या संख्येने दुपारी ४ वाजल्यापासून ताटकळत उभे राहतात.अनेक वर्षांपासून अमिताभ बच्चन यांची एक झलक बघायला मिळावी,अशी माझी मनापासून इच्छा होती,ती पूर्ण झाली ती त्यांच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी ती म्हणजे १ ० ऑक्टो. २०११ रोजी.संपूर्ण कौन बनेगा करोडपती आपण दूरसंच्यावर जसा पाहतो तसा एकदाही विश्रांती न घेता अखंड चित्रित होतो हि माझ्यासाठी एकदम नवी गोष्ट होती याअगोदर मी अनेक रिअलिटी कारेक्रमांच्या चित्रीकरणाला उपस्थित होतो त्यामुळे हा अखंडपणा प्रथमच माझ्या पाहण्यात येत होता,चित्रपट श्रुष्टीमद्धे वन टेक दृश्य देणारा अभिनेता म्हणून अमिताभ बच्चन यांची ख्याती आहे ती खोटी नव्हे . . . त्यावेळी माझे मित्र नागेशजी,आणि बापटजी यांच्या बच्चन कुटुंबियांशी असणार्या स्नेहामुळे त्या कारेक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली होती,बच्चन जी यांचे स्वीय सहायक हे अगदी आम्ही पुण्यावरून निघेपासून ते कारेक्रमात बसेपर्यंत,आणि तेथून निघेपर्यंत कायम आमच्या संपर्कात होते.अगदी कारेक्रामाचे स्टील फोटो काढणार्या पर्यंत त्यांनी सर्व सेटिंग लावली होती आणि त्यामुळेच आम्हाला २ र्या असन क्रमांकाची सीट मिळाली आणि हे छायाचित्र देखील.




असो कारेक्रम सुरु होण्यापूर्वीच्या वेळात अमिताभ हे प्रेक्षकांशी संवाद साधत त्यांची विचारपूस करत,आणि विचारलेल्या प्रश्नाला प्रत्येकाला तेवढ्याच आत्मीयतेने,नम्रतेने उत्तर देत . . . 
माणसाला एखादी गोष्ट मिळाली ती त्याची हाव वाढतच जाते. त्याप्रमाणे मला त्यांना काही क्षण का होयीना भेटण्याची इछ्या झाली आणि असलेल्या ओळखी मुळे सुरक्षा ओलांडून त्यांच्या गाडी बाहेर सुमारे एक तासापेक्षा अधिक वेळ उभे होतो पण बच्चन साहेब चित्रीकरण वेळी कोणाला भेटत नाहीत हे हि समजले आणि ते संपण्यास रात्री १  होते आणि शिवाय भेटण्याची शाश्वती नव्हती पण चित्रीकरण तंत्र,प्रसिद्धीच्या,यशाच्या शिखरावर असताना देखील कसे जमिनीवर राहावे रसिकांशि कसे वागावे हे त्यांच्या कडून प्रत्येकाला शिक् ण्यासारखेच आहे.    
असो या महान व्यक्तीला भेटण्याची प्रचंड इछ्या जागृत झाली आणि तेव्हा पासून त्यांना प्रत्येक सणाला,त्यांच्या चित्रपटाबद्दल अभिप्राय पत्राने कळवायला लागलो,त्यांना मी तब्बल ३७ पत्र आत्ता पर्यंत पाठवली आहेत पण त्याचा विशेष उपयोग झाला नाही,मेहनती पेक्षा वशिला मोठा झाल्याच हे द्योतक आहे.असो . . .  

त्यानंतर २०१२ मद्धे पुन्हा KBC चे पास मिळाले आणि नेमकी "वर्तमान" या चित्रपटात मला भूमिका मिळाली होती आणि त्याच दिवशी चित्रीकरणाला आम्हाला बोलावले होते पण कामाला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे म्हणून मी त्यावेळी जाऊ शकलो नाही पण माझ्या एवेजी श्रेयसजी हे बच्चनजींचे मोठे चाहते होते त्यांचा नंबर लागला,त्यांनी कारेक्रम पाहिला असलेल्या ओळखीमुळे बच्चन साहेब यांची स्वाक्षरी मिळवली आणि अगदी आनंदाने बेभान झाले आणि मला फोन वरून हि गोष्ट कळली तेव्हा एका निस्सीम चाहत्याची भेट झाल्याने  प्रचंड आनंद वाटला आणि नेमकी माझी शूटिंग याच दिवशी यायची होती हा स्वार्थ वजा (खंत युक्त) विचार देखील येउन गेला.पण प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ यावी लागते म्हणतात ते खरेच आहे.

     २ १ जुलै २ ० १ ३ रोजी माझी आवडती गायिका श्रेया घोशाल ला भेटण्याचा योग आला होता त्यासाठी फिल्म सिटी मुंबई येथे इंडिअन आयडॉल चे पास आम्ही चांगल्या संपर्कामुळे सोनी वाहिनीकडून मिळवले होते.आणि चित्रीकरण २.३० या वेळी सुरु होणार होते,आम्ही तेथील रिलयिन्स स्टूडीओ मद्धे पोहोचलो,कारेक्रमात बसलो देखील. पण त्यागोदर सहज एक संदेश आम्ही बच्चन यांच्या स्वीय सहायकाला पाठवला कि आम्ही मुंबई मद्धे आलो आहोत (हा संदेश पाठवण्याची माझी अजिबात इछ्या नव्हती तरीदेखील अशा आणि प्रयत्न . . . ). आणि त्यानंतर मोबयील silent मोड वर करून कारेक्रम सुरु होण्याची वाट पाहू लागलो,कारेक्रमाला अजून अवधी होता, वेळ जावा म्हणून आम्ही पुन्हा मोबयील बाहेर काढला तर त्यांच्या सहायकाचे तब्बल ५ मिसकॉल दिसले,पण आता कारेक्रमामधून बाहेर पडता हि येत नव्हते आता काय करणार ? ? ?
मग अंगात अभिनयाचे गुण  आहेत त्याचा उपयोग  केव्हा होणार ?
तडक उठलो आणि तिथल्या माणसाला बाहेर जायच आहे असा सांगितल तो सहज जाऊ देणार नव्हताच त्यामुळे बाथरूम ला जाने प्रचंड गरजेचे आहे हे सांगून मी बाहेर पडलो पण माझे मित्र मद्धे अडकले मग त्यांनी सुद्धा काहीतरी कारण सांगितला तडक बाहेर पडलो.
तेथून रिक्षा केला आणि त्यांना सांगितल जुहु ला जलसा ला सोडा त्यांनी मला तो परिसर किती पाठ आहे आणि आम्हाला कलाकाराचे काहीहि आकर्षण वाटत नाही याचे किस्से जायीपर्यंत ऐकवले आणि शेवटी एका बंगल्याबाहेर थांबवून समोर जलसा आहे असे सांगितले आणि भाडे रु १५७ घेऊन तो निघून गेला,त्यावेळी पाऊस  सुरु होता आम्ही दोघे हातात छत्री घेऊन ४.३० पासून ५ वाजेपर्यंत त्या बंगल्या बाहेर बसून होतो पण त्यांना रविवारी भेटायला अलोट गर्दी होते हे वाक्य आता खोटे वाटायला लागले होते कारण बंगल्या बाहेर आम्ही दोघेच . . .

मग काही वेळाने २ मुलं  आमच्या बाजूला आली आणि त्यांनी प्रश्न केला . . .
" हा अभिषेक बच्चन यांचा "प्रतीक्षा" ना ? "

"अरे नाही हा अमिताभ बच्चन यांचा "जलसा" आहे"

( अनेकवेळा माझेच खरे हा फुकटा आत्मविश्वास दाखवण्याचा मी अनेक वेळा प्रयत्न करतो आणि लगेच जमिनीवर आपटतो देखील  . . .)

"अरे हा जलसा नाही जलसा मला माहित आहे तो पुढे सिग्नल ला आहे "

असो तो म्हणाला मी जलसा कडे चाललो आहे तुम्ही येणार असाल तर चला शेवटी लवकर समाजल्याबद्दल देवाचे आभार मानत आम्ही जलसा बाहेर गेलो पहातो तर चाहत्यांची प्रचंड अलोट गर्दी.






त्याच गर्दीत आम्ही एक झालो आणि त्यांच्या सहायकाला फोन केला ते बाहेर आले आणि वशिल्याने आम्ही एकदम शेजारी दारा समोर थांबलो.६ वाजले बच्चन साहेब आले जलसा चे दरवाजे उघडले गेले आणि अनेक जणांनी मंत्रमुग्ध तो क्षण डोळ्यात साठवला.मी तर केवळ हात जोडून पाहत होतो.त्याच गर्दीत दिग्दर्शक सुधीर मिश्रा आले आणि आत जाऊन थांबले.काही वेळात जलसा चे दरवाजे पुन्हा लावले गेले आणि त्यांच्या सहयाकाने आम्हाला आत बोलावले दरवाजा उघडून आम्ही आत गेलो समोर अंगणात बच्चन साहेब थांबलेले हातातली छत्री तेथेच टाकून बच्चन साहेबांना साष्टांग नमस्कार केला आणि सिलसिला,सात हिन्दुस्तानी,डॉन,शराबी या चित्रपटांची नावे घेण्याचा व्यर्थ प्रयत्न करू लागलो पण शेवट पर्यंत शब्दच फुटेनात मग साहेबांचा "निशब्द" आठवला आणि गप्प बसलो,
त्यांना ते लक्षात आले आणि छोटेसे हसू त्यांच्या चेहऱ्यावर उमटले . . .

आणि माझा नेहमीचा  हसतमुख चेहऱ्याने बाजूला जाऊन उभे टाकणे आणि सोबत छायाचित्र काढून घेणे हा महत्वाचा कारेक्रम उरकून घेतला


सुधीर मिश्रा हे अमिताभ यांच्या  ए बी कोर्प या संस्थे मार्फत निर्माण होणार्या आगामी चित्रपटाची चर्चा करण्यासाठी उभे होते,अतिशय नम्रतेने अमिताभजींनी आमचा निरोप घेतला . . .

आदरयुक्त भीतीने माझे हास्य कुठल्या कुठे गायब झाले होते,आणि माझ्या बर्याच मित्रांनी याबाबत जेव्हा मला विचारल
कि अरे तू बच्चनजींच्या फोटोतच हसलाच नाहीस ?
त्या वेळी मला क्षणभर मिल्खा सिंग असल्याचा भास झाला . . . केवळ शेवटच्या क्षणी मागे वळून पाहिल्यामुळे त्याचे मेडल हुकले तसेच माझ्या फोटोच्या बाबतीत झाले कि काय ? ? ?

गमतीचा भाग सोडला तर खरोखरच त्यांना भेटणं,त्यासाठी प्रयत्न करण या केलेल्या श्रमाचं ते साफल्य होत आणि तो क्षण अविस्मरणीयच होता . . .
असा म्हणल जातं कि तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल सतत विचार करत गेलात आणि त्या दृष्टीने योग्य प्रयत्न केले तर नक्की यश हे मिळतेच . . . खरच हा साक्षात्कार मला झाला . . .

थोडक्यात भेटायला गेलो श्रेया घोशाल ला आणि भेटून आलो शहेनशाह अमिताभ बच्चन ला . . .

- श्रीनिवास कुलकर्णी.           

Tuesday, August 27, 2013

भारतीय राजकारण आणि युवक . . .

भारतीय राजकारण आणि युवक . . .

भारत देशाला आज महसत्तेचा प्रबळ दावेदार मानले जाते,पण खरी परिस्थिती पाहिली तर रुपयाचे मुल्य दिवसेंदिवस खालावत चालले आहे,सामान्य व्यक्तीला जीवन आवश्यक गरजा भागवणे कठीण झाले आहे त्यात भ्रष्ट राजकारणी,असक्षम न्यायव्यवस्था,मुजोर नोकरशाही,वाढता आतंकवाद,महागाई,बेरोजगारी,शिक्षणाचा बाजार यामुळे देशासमोरील समस्या अधिकच वाढत आहेत.तर आमच्या देशातील जेष्ठ नेते मंडळी ६०० रु. मद्धे कुटुंबातील ५ व्यक्तींचा  उदरनिर्वाह होऊ शकतो असे सांगून एकप्रकारे गरिबांची थट्टाच करतात.यामुळे नेहमी कोठेतरी सोशल साईट वर व्यक्त होऊन,तीव्र प्रतिक्रिया नोंदवून हे प्रश्न सुटणार नाहीत तर गरज आहे आता युवकांनी पुढे येउन देशाला या संकटातून बाहेर काढण्याची.आजचा युवक संवेदनशील नाही,किवा पेटून उठण्याची त्याच्यामद्धे क्षमता नाही असे म्हणले जाते पण जर हे बरोबर असेल तर अण्णा हजारेंना जो पाठींबा मिळाला त्यात तरुणांचा सहभाग सर्वाधिक होता यातून असे दिसते कि आजच्या युवकाला सामाजिक जाणीव आहे,काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आहे पण त्याला गरज आहे ती पाठिंब्याची,विचाराची,एका दिशादर्शकाची.

दक्षिण आफ्रिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांनी सत्ता चालविण्यास कार्यक्षम असताना स्वत:हून नव्या पिढीच्या हाती सत्ता सूत्रे देवून एक आदर्श उदाहरण घालून दिला पण भारत देशाचा विचार केला तर अगदी वयाची ऐंशी उलटली तरी सत्तेचा मोह सुटत नाही.देशात सरकारी नौकरदरांसाठी वयाची मर्यादा आहे मग ती राजकारण्यांच्या बाबतीत का पाळली जात नाही ? त्यामुळे कोणतीही निवडणूक लढविण्याचे आणि सत्तेच्या पदावर बसण्याचे वय कायदेशीररित्या जास्तीतजास्त ६० वर्ष असावे,यावर कायद्याने निर्बंध आणल्या शिवाय हा प्रश्न सुटणारा नाही.कायद्यामद्धे करावेत असे काही आवश्यक बदल असे  -

१. कोणतीही निवडणूक लढविण्याचे आणि सत्तेच्या पदावर बसण्याचे वय जास्तीतजास्त ६० असावे असा कायदा केला जावा.

२. कोणत्याही उमेदवाराला विधानसभा किंवा लोकसभा निवडणुका फक्त दोनदा लढविता येतील आणि सत्तेच कोणतही पद केवळ दोन वेळा भूषवता येईल.

३. उमेदवारांची पाश्र्वभूमी तपासली जावी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्या नेत्यांना निवडणूक लढवण्यास बंधी घालण्यात यावी.

४.मतदान हे सक्तीचे करण्यात यावे.

निवडणूक कायद्यात बदल केले तरच तरुणांसाठी राजकारणात संधी उपलब्ध होईल आणि तरुण मोठया संख्येने राजकारणात सक्रीय होवू शकेल.तरुणांनी राजकारणात यावे हे काही नेते मंडळी सांगतात त्यामुळे त्यांना खरच असे वाटत असेल तर त्यांनी अशा प्रकारच्या बदलासाठी प्रयत्न केले पाहिजेत.आज देशातील तरुण नेत्यांचा शोध घेतला तर ती संख्या अगदी विरळ आणि बहुतांशी नावे राजकीय वारसदारांची असल्याचे निदर्शनास येते आणि तसा आरोप केला कि डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, इंजिनिअरचा इंजिनिअर मग नेत्याचा मुलगा नेता का होऊ शकत नाही? असा उलट प्रश्न विचारला जातो प्रश्न जरी योग्य असला तरी बाकी मुले स्वतः च्या कार्तुत्वावर समोर येतात वडिलांच्या कृपेमुळे नाही.आणि नेत्यांच्या मुलांनी जरूर राजकारणात यावे पण स्वतःच्या कर्तुत्वावर . . . त्याला राजकीय हस्तक्षेप नको.

मागे भारतरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांनी "कॉलेज,विद्यापीठ येथे निवडणुका असाव्यात त्यातून अनेक तरुण राजकारणी मिळतील" असे मत व्यक्त केले होते पण कालांतराने निवडणुका बंद झाल्या तश्या विद्यार्थी चळवळी हि थंड झाल्या.विविध विद्धार्थी संगठना या राजकीय पक्षाच्या आणि महाविद्यालय,विद्यापीठ हि देखील राजकारण्यांची झाल्यामुळे त्याविरोधात या संघटनानि आवाज उठवणे बंद केले त्यामुळेच आज शिक्षण क्षेत्रातहि भ्रष्टाचार वाढला आहे.हे थांबवण्यासाठी युवकांनी एकत्र येणे गरजेचे आहे.

आजचा तरुण हुशार आहे,धडाडी आहे तो ह्या गैरप्रकारांना भिक न घालता पुढे जाऊ शकतो त्यामुळे जर देशात सकारात्मक बदल घडवायचे असतील आणि राजकारणाप्रती ढासळत असलेला विश्वास पुन्हा निर्माण करायचा असेल तर युवकांना जास्तीत जास्ती संधी देऊन राजकीय क्षेत्रात बदल घडवून आणण्याशिवाय  दुसरा पर्याय नाही.

- श्रीनिवास कुलकर्णी.

Wednesday, August 21, 2013

(100 crore club) शंभर कोटी क्लब : चित्रपट यशाचं बदलतं परिमाण



शंभर कोटी क्लब : चित्रपट यशाचं बदलतं परिमाण 




चित्रपट म्हणजे नेमक काय ? त्याकडे कलात्मक दृष्टीने पहिले पाहिजे कि मनोरंजन या हेतूने ? याबाबत अनेक मतांतर आढळतात.खरंतर चित्रपट म्हणजे मानवी भावनांचं पडद्यावर उमटणारं प्रतिबिंब आणि या कल्पकतेच्या दुनियेशी रसिकांनी समरस व्हावं,त्यात रंगून जावं यासाठी श्रुजनशील प्रतीभेद्वारा स्फुरलेल्या कल्पनांचं केलेलं रेखाटन,ते अनुभवताना रसिक हर्षभरित,अस्वस्थ,खिन्न झाला तर साधारणतः चित्रपट परिणामकारक झाला असं मानलं जातं,पूर्वी एकाच सिनेमागृहात पन्नास,शंभर आठवडे चालणाऱ्या सिनेमांची यशस्वी सिनेमांमध्ये गणती व्हायची पण बदलत्या कालानुरूप चित्रपटांच्या यशाच्या कल्पना बदलत चालल्या आहेत,हल्ली सिनेमांनी १००  कोटी कमावले म्हणजे तो यशस्वी असा समज रूढ होत चालला आहे.मग आठवड्याभरात जरी कोटींचा व्यवसाय करून सिनेमा थिएटरमधून उतरला तरी चालेल.एकंदरीत चित्रपट श्रुष्टीमद्धे  सध्या ' शंभर कोटीं क्लब' चा दबदबा आहे,अमीर खान च्या 'गजनी' चित्रपटापासून सुरु झालेल्या या क्लब चा सदस्य असण म्हणजे आज गौरावास्पद बाब मानली जाते,



आता हे शंभर कोटींचं गणित कसं जुळून येतं त्यावर थोडा दृष्टीषेप टाकूया,दशकभरापूर्वी चित्रपटाच्या प्रिंट्स काढल्या जायच्या त्यामुळे प्रिंट्सच्या संखेप्रमाणे तो प्रदर्शित केला जायचा.परंतु,हल्ली  चित्रपटाच्या प्रिंटची संख्या वाढवल्यामुळे चित्रपट एकाच वेळी अनेक चित्रपट गृहात दाखवला जातो.तसेच ‘यूएफओ’या तंत्रज्ञानामुळे चित्रपटाची प्रिंट काढण्याची गरज राहिलेली नाही.सॅटेलाईट प्रक्षेपणाद्वारे चित्रपट एकाच वेळी असंख्य चित्रपटगृहात  जगभरात कुठेही दाखवला जाऊ शकतो. त्यामुळे नवीन चित्रपटांच्या ‘स्क्रीन्स’ आणि ‘शोज’ची संख्या झपाट्यानं वाढलीय.नुकताच आलेला ‘चेन्नई एक्स्प्रेस’ जवळपास साडे तीन हजार ‘स्क्रीन्स’मध्ये प्रदर्शित झाला. त्यामुळे या चित्रपटान  पहिल्या तीन दिवसान मधेच १००  कोटींचा व्यवसाय केला. गेल्या काही महिन्यांमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बिगबजेट’ चित्रपटांच्या ‘स्क्रीन्स’ची सरासरी पहिली तर ती दोन ते तीन हजाराच्या आसपास आहे,त्यामुळे प्रदर्शित झाल्यानंतर अधिकधीक रसिक सुरवातीच्या दिवसात (चित्रपटाचा दर्जा ठरण्या अगोदरच) चित्रपट पाहतात आणि यादरम्यानच निर्माते  गल्ला कमावून घेतात.

चित्रपट प्रदर्शनाची तारीख अगदी वर्षभर आधी ठरवली जाते,त्यामुळे त्यादिवशी इतर मोठे चित्रपट प्रदर्शित होऊ दिले जात नाहीत (किवां निर्मातेही ते जाणीवपूर्वक टाळतात),वर्तमानपत्रे, मासिकं, टीव्ही वाहिन्या, रेडिओ केंद्रे अश्या सर्व ठिकाणी या चित्रपटांची प्रसिद्धी केली जाते त्यासाठी ३० ते ४० कोटी रुपये खर्च केले जातात,सोबतच सिनेमात मोठे स्टार्स असतील तर प्रेक्षकांचा चित्रपटाला हमखास प्रचंड प्रतिसाद लाभतो त्यामुळेच कि काय 'एक था टायगर',' रेडी','चेन्नई एक्स्प्रेस' असे कथानकात फारसा दम नसलेले सिनेमेही बॉक्स ऑफिसवर शंभर कोटींच्या वर गल्ला जमवितात.त्यामुळे सिनेमागृहांचे गणित,प्रदर्शनापूर्वी केलेली प्रसिद्धी या जोरावर सिनेमा कोटींवर पैसे कमावतो,चित्रपटाच्या निर्मितीपासून विचार केला तर तो प्रदर्शित होई पर्यंत जवळ जवळ ८० ते ९० कोटी खर्च होतात त्यामुळे प्रत्येक्षात खर्च वजा जाता खरी कमाई किती याचा विचार करावा लागेल.



आजच्या चित्रपट श्रुष्टीत असा समाज होत चालला आहे कि चित्रपट किती चित्रपट गृहात हाउसफुल  चालला ? किती कोटींची कमाई केली ? हे जाहिराती,सोशल नेटवर्किंग यामार्फत ओरडून जगाला सांगितलं कि प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचून तो धावत प्रेक्षक गृहात येयील.पण बाहेर कोटीच्या कोटी कमावल्याच्या बातम्या वाचताना प्रत्यक्षात चित्रपट गृहात केवळ २० ते २५ प्रेक्षक दिसतात.असो हा बदलत्या काळाचा महिमा असला तरी जे रसिक चित्रपटातून मिळालेले मानसिक (आत्मिक) सुख पाहतात त्यांच्यावर या आकड्यांचा विशेष परिणाम होताना दिसत नहि,त्यामुळे अनेक चित्रपट रसिकांच्या ह्रिदयात स्थान मिळवतात  हे यश पैशात न मोजता परिणामात मोजले जाते.

पूर्वीच्या 'मदर इंडिया','मुगल-ए-आझम','बॉबी' या चित्रपटांचे ज्यूबली यश लक्षात घेताना त्याची आर्थिक बाजू कोणालाच तपासावीशी वाटली नाही.जुन्या काळी अमिताभच्या फ्लॉप चित्रपटांची कमाई इतर 'जुबली हिट' चित्रपटांपेक्षा जास्त असल्याच्या चर्चा व्हायच्या असे जाणकार सांगतात.चित्रपट बदलला तसेच यशाचे परिमाण देखील बदलत चालले आहे,बऱ्याचदा असं होऊ शकतं की व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी असलेला चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला तो आवडेलच याची शाश्वती देता येत नाही,त्यामुळे निर्माता,दिग्दर्शकांनी व्यावसायिक दृष्टीकोनासोबतच कलात्मक दृष्टीकोनही जपायला हवा आपली कलाकृती  कितपत रसिकांना आवडेल याचा विचार व्हावा अन्यथा या आकड्यांच्या ओझ्याखाली दबून त्यातली कल्पकता हरवू नये म्हणजे मिळवलं.

------------------------------------------------------------------------------------------------------

"नुकताच मी मद्रास कॅफे हा चित्रपट बनवला असून यामद्धे कलात्मकता जपण्याचा प्रयत्न केलेला आहे,हा चित्रपट कितपत  व्यवसाय करेल,याची काळजी आम्हाला नाही.चित्रपट वेगळ्या धाटणीचा असून यावर मी पाच,सहा वर्षांपासून काम करत आहे, शिवाय 100 कोटी रुपयांचा व्यवसाय करणारे सगळेच चित्रपट खूप दर्जेदार असतात, हा समजच चुकीचा आहे.''

- जॉन अब्राहम.
-------------------------------------------------------------------------------------------------------
"मी कधीच प्रेक्षकांना निराश करत नाही,प्रेक्षकांना जे हवे ते देण्याचा नेहमीच माझा प्रयत्न असतो आणि मी बर्याच वेळा त्यात यशस्वी झालो आहे,हे यापूर्वी माझ्या चित्रपटांच्या कामाईतून सिद्ध झालेले आहे".

- साजिद खान
-------------------------------------------------------------------------------------------------------


- श्रीनिवास कुलकर्णी.