Tuesday, August 27, 2013

भारतीय राजकारण आणि युवक . . .

भारतीय राजकारण आणि युवक . . .

भारत देशाला आज महसत्तेचा प्रबळ दावेदार मानले जाते,पण खरी परिस्थिती पाहिली तर रुपयाचे मुल्य दिवसेंदिवस खालावत चालले आहे,सामान्य व्यक्तीला जीवन आवश्यक गरजा भागवणे कठीण झाले आहे त्यात भ्रष्ट राजकारणी,असक्षम न्यायव्यवस्था,मुजोर नोकरशाही,वाढता आतंकवाद,महागाई,बेरोजगारी,शिक्षणाचा बाजार यामुळे देशासमोरील समस्या अधिकच वाढत आहेत.तर आमच्या देशातील जेष्ठ नेते मंडळी ६०० रु. मद्धे कुटुंबातील ५ व्यक्तींचा  उदरनिर्वाह होऊ शकतो असे सांगून एकप्रकारे गरिबांची थट्टाच करतात.यामुळे नेहमी कोठेतरी सोशल साईट वर व्यक्त होऊन,तीव्र प्रतिक्रिया नोंदवून हे प्रश्न सुटणार नाहीत तर गरज आहे आता युवकांनी पुढे येउन देशाला या संकटातून बाहेर काढण्याची.आजचा युवक संवेदनशील नाही,किवा पेटून उठण्याची त्याच्यामद्धे क्षमता नाही असे म्हणले जाते पण जर हे बरोबर असेल तर अण्णा हजारेंना जो पाठींबा मिळाला त्यात तरुणांचा सहभाग सर्वाधिक होता यातून असे दिसते कि आजच्या युवकाला सामाजिक जाणीव आहे,काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आहे पण त्याला गरज आहे ती पाठिंब्याची,विचाराची,एका दिशादर्शकाची.

दक्षिण आफ्रिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांनी सत्ता चालविण्यास कार्यक्षम असताना स्वत:हून नव्या पिढीच्या हाती सत्ता सूत्रे देवून एक आदर्श उदाहरण घालून दिला पण भारत देशाचा विचार केला तर अगदी वयाची ऐंशी उलटली तरी सत्तेचा मोह सुटत नाही.देशात सरकारी नौकरदरांसाठी वयाची मर्यादा आहे मग ती राजकारण्यांच्या बाबतीत का पाळली जात नाही ? त्यामुळे कोणतीही निवडणूक लढविण्याचे आणि सत्तेच्या पदावर बसण्याचे वय कायदेशीररित्या जास्तीतजास्त ६० वर्ष असावे,यावर कायद्याने निर्बंध आणल्या शिवाय हा प्रश्न सुटणारा नाही.कायद्यामद्धे करावेत असे काही आवश्यक बदल असे  -

१. कोणतीही निवडणूक लढविण्याचे आणि सत्तेच्या पदावर बसण्याचे वय जास्तीतजास्त ६० असावे असा कायदा केला जावा.

२. कोणत्याही उमेदवाराला विधानसभा किंवा लोकसभा निवडणुका फक्त दोनदा लढविता येतील आणि सत्तेच कोणतही पद केवळ दोन वेळा भूषवता येईल.

३. उमेदवारांची पाश्र्वभूमी तपासली जावी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्या नेत्यांना निवडणूक लढवण्यास बंधी घालण्यात यावी.

४.मतदान हे सक्तीचे करण्यात यावे.

निवडणूक कायद्यात बदल केले तरच तरुणांसाठी राजकारणात संधी उपलब्ध होईल आणि तरुण मोठया संख्येने राजकारणात सक्रीय होवू शकेल.तरुणांनी राजकारणात यावे हे काही नेते मंडळी सांगतात त्यामुळे त्यांना खरच असे वाटत असेल तर त्यांनी अशा प्रकारच्या बदलासाठी प्रयत्न केले पाहिजेत.आज देशातील तरुण नेत्यांचा शोध घेतला तर ती संख्या अगदी विरळ आणि बहुतांशी नावे राजकीय वारसदारांची असल्याचे निदर्शनास येते आणि तसा आरोप केला कि डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, इंजिनिअरचा इंजिनिअर मग नेत्याचा मुलगा नेता का होऊ शकत नाही? असा उलट प्रश्न विचारला जातो प्रश्न जरी योग्य असला तरी बाकी मुले स्वतः च्या कार्तुत्वावर समोर येतात वडिलांच्या कृपेमुळे नाही.आणि नेत्यांच्या मुलांनी जरूर राजकारणात यावे पण स्वतःच्या कर्तुत्वावर . . . त्याला राजकीय हस्तक्षेप नको.

मागे भारतरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांनी "कॉलेज,विद्यापीठ येथे निवडणुका असाव्यात त्यातून अनेक तरुण राजकारणी मिळतील" असे मत व्यक्त केले होते पण कालांतराने निवडणुका बंद झाल्या तश्या विद्यार्थी चळवळी हि थंड झाल्या.विविध विद्धार्थी संगठना या राजकीय पक्षाच्या आणि महाविद्यालय,विद्यापीठ हि देखील राजकारण्यांची झाल्यामुळे त्याविरोधात या संघटनानि आवाज उठवणे बंद केले त्यामुळेच आज शिक्षण क्षेत्रातहि भ्रष्टाचार वाढला आहे.हे थांबवण्यासाठी युवकांनी एकत्र येणे गरजेचे आहे.

आजचा तरुण हुशार आहे,धडाडी आहे तो ह्या गैरप्रकारांना भिक न घालता पुढे जाऊ शकतो त्यामुळे जर देशात सकारात्मक बदल घडवायचे असतील आणि राजकारणाप्रती ढासळत असलेला विश्वास पुन्हा निर्माण करायचा असेल तर युवकांना जास्तीत जास्ती संधी देऊन राजकीय क्षेत्रात बदल घडवून आणण्याशिवाय  दुसरा पर्याय नाही.

- श्रीनिवास कुलकर्णी.

No comments:

Post a Comment