Sunday, August 11, 2013

"स्व" त्व हरवत चाललेल्या मालिका . . .




"स्व" त्व हरवत चाललेल्या मालिका . . . 



काहि दिवसांपूर्वीच जेष्ठ अभिनेते आणि ज्येष्ठ लेखक मंगेश कुलकर्णी यांनी 'आंबट गोड' या मालिकेसाठी काम करण थांबवलं.मालिकांमध्ये टीआरपीसाठी वाट्टेल ते दाखवलं जात जे कि चुकीच आहे आणि याबाबत दिग्दर्शक,अभिनेते,जाणकार रसिक शांत बसतात यावर त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली.यावरून मनामद्धे विचार आला कि खरोखरच आजकालच्या मालीकांमद्धे हे काय चाललंय ?, देशात एकामागोमाग एक भयंकर,हृदय हेलावून टाकणाऱ्या घटना घडताना दिसतात आणि मन खिन्न होते.वाढते घटस्फोट,गुन्हेगारी,व्यसनाधीनता या सर्वांना कोठेतरी सध्या दुरचित्र वाहिनीवरील चित्रपट,मालिका देखील बर्याच अंशी जबाबदार आहेत असे मनोमन वाटत रहाते.लहानपणी आई,वडील आणि गुरु यांसोबतच कोठेतरी दूरचित्रवाणीचा देखील संस्कार  देण्यात मोठा वाटा आहे असे मला नेहमी वाटते,

वर्षभरापूर्वी पन्नास हजार रुपयांच्या खंडणीसाठी दोन अल्पवयीन मुलांसह तिघांनी आपल्याच मित्राचे अपहरण करून खून केला आणि हा प्रकार टीव्हीवरील गुन्हेगारीविषयक मालिका पाहून केल्याची कबुली त्यांनी त्यावेळी दिली होती.तसेच चित्रपट,मालिका यांतून दाखवल्या जाणार्‍या आक्षेपार्ह आणि अश्‍लील दृश्यांमुळे कुटुंब व्यवस्थेवर वाईट परिणाम होत असल्यामुळे वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावातील आझादनगर जिल्ह्यात रहाणार्‍या मुसलमान कुटुंबांनी घरातील दूरचित्रवाणी संच रॉकेल ओतून जाळून टाकले.या घटना विषयाचे गांभीर्य अधोरेखित करणाऱ्या ठरतात.

आजकालच्या मालिकांचा विचार केला तर अगदी लेखनाचा अनुभव नसणारा व्यक्ती देखील आज सहज एखादी मालिका लिहू शकेल,अलीकडच्या मालिकांच्या कथानकाचा विचार केला तर एक सत्याची साथ देणारी,चिकाटीने संकटांना सामोरी जाणारी,सुंदर,सुसंस्कृत नायिका आणि तिच्या घरात कोणी-ना-कोणी तिच्या वाईटावर टपलेले उदा.-तिची सासू,मैत्रीण,वहिनी,बहिण इतर.जिच्या पतीचे कोणासोबत तरी संबंध,मग अस्तित्वाचा लढा आणि नेहमीच होणारा सत्याचा विजय वैगेरे,तसेच मला नेहमी कुतूहलाचा (संशोधनाचा) विषय वाटतो तो म्हणजे मालिकेतील पात्रांचे मृत्यू आणि त्यांचे परत येणे,त्यासाठी अपघातात स्मृती गेलेल्या अवस्थेत सापडणे,प्लास्टिक सर्जरी करणे,जुळे असणे,त्यांचा पुनर्जन्म करणे असे पर्याय शोधले जातात,यातील पात्रांची रंगभूषा हा देखील एक गमतीदार विषय आहे.जुन्या काळी कृष्ण-धवल चित्र स्पष्ट दिसण्यासाठी भडक रंगभूषा केली जायची पण हल्ली (स्वत:च्या लग्नात देखील नवरी करत नसेल इतके) गडद मेकअप केले जातात त्यात मालिकेचा कालावधी वाढवण्यासाठी (किंवा कलाकारातील उणीवा लपवण्यासाठी) वापरले जाणारे विविध बाजूने कॅमेरा हताळण्याचे तंत्र हे सर्व पाहणं बर्याच वेळा असह्य होऊन जातं.काही मालिकांना विनोदी मालिका म्हणणं हाच त्यातील मोठा विनोद असावा कदाचित,मालिकेत सादर झालेला विनोद होता हे बर्याच वेळा त्यातील (हसण्याचे पैसे घेतलेल्या) प्रेक्षकांमुळे कळते.

दहा-बारा वर्षांपूर्वी ज्या चांगल्या मालिका पहिल्या तश्या मालिका आजतागायत पाहायला मिळाल्या नाहीत याची खंत अनेक जण व्यक्त करतात.त्याकाळी एकच वाहिनी होती ती म्हणजे दूरदर्शन,यावरील रामायण,महाभारत,श्री कृष्ण या मालिकांमुळे दुरचित्र संचाला लोकांनी अक्षरशः  हार,हळद-कुंकू वाहून पूजा केल्याच वाचलं आहे.अगदी रोज शाळेत जाण्यासाठी लवकर उठण्याचा कंटाळा करणारी आम्ही मुलं देखील रविवारी सकाळीच या मालिका पाहण्यासाठी अंघोळ करून संचासमोर बसल्याच मला आजही आठवत.त्यावेळी संध्याकाळी सातच्या  बातम्यात योग्य आणि महत्वाच तेवढच दाखवलं जायचं,ब्रेकिंग न्यूज या नावाखाली फालतू बातम्या दाखवण्याची पद्धत त्यावेळी नव्हती.द ग्रेट मराठा,टिपू सुलतान,सुरभी,भारत एक खोज,मालगुडी डेज,वागले कि दुनिया,स्वामी,शांती,चंद्रकांता,व्योमकेश बक्षी अश्या सरस मालिका त्याकाळी होत्या,खास लहानांसाठी बालचीत्रवाणी,मोगली,अलिफ लैला,शक्तिमान अश्या मालिका होत्या,दूरदर्शन वरील गीते देखील विशेष गाजली त्यात मिले सूर मेरा तुम्हारा,पूरबसे सूर्य उगा,बजे सरगम,स्कूल चले हम अश्या अनेक सुमधुर गीतांचा उल्लेख करावाच लागेल.असो आठवणीत रममाण होणे हा मनुष्याचा स्थायीभावच आहे.


नुकतच दूरदर्शनने इतर वाहिन्यांच्या पावलावर पाउल टाकत अधिक सुस्पष्ट (एच डी) स्वरुपात येत असल्याचं जाहीर केलय पण त्यावरिल चित्र,सामाजिक जाणीवा अधिकच अस्पष्ट होत चालल्या आहेत.मोडून पडत चाललेली कुटुंब-पद्धती,दुरावत चाललेले  परस्परसंबंध,जीवघेणी स्पर्धा गतिमान जीवन-पद्धती,कमालीची व्यावहारिकता, अनेकांना या प्रश्नांकडे पाहायला वेळ नाही,अशातच चित्रपट,मालिकांमधून यांसारख्या विषयांना अधिकच खतपाणी घातले जाते.एकत्र कुटुंब पद्धतीचे मोठ्या प्रमाणात रूपांतर विभक्त कुटुंबात झाल्याने तरुण पिढी अनुभवी आजी-आजोबांपासून दुरावली आहे. कुटुंबातील वैचारिक देवाणघेवाण, संवाद कमी होऊन प्रसारमाध्यमांचा प्रभाव वाढल्याने नको त्या गोष्टी दृश्यस्वरूपात समोर येतात.यासर्वांमुळे दोन पिढय़ांमधील विचारांतील दरी वाढून नात्यांचे महत्त्व आणि त्यातील अंतर यामद्धे मोठी पोकळी निर्माण झाली आहे.हे चित्र बदलण्यासाठी वेळीच प्रयत्न केले गेले नाहीत तर याचे गंभीर परिणाम येणाऱ्या काळात समाजव्यवस्थेवर होतील.त्यामुळे या गोष्टींचा विचार सर्वानीच करणे अतिशय गरजेचं आहे.  

(या विषयावर काही मान्यवरांची मते)
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
"मालिकेचा दर्जा दिवसें दिवस खालावत चालला आहे.काही चांगली कलाकृती सादर करावी असे कुणालाच मनापासून वाटत नाही.महिलांवरील अत्याचार,गुन्हे अश्या आशयाच्या मालिकांमुळे समाजावर विघातक परिणाम होत असून दर्जेदार आणि सामाजिक मुल्ये जपणाऱ्या मालिकांची सध्या गरज आहे,यामुळेच सद्ध्या काही भागांची मालिका मी बनवत असून त्यात अमिताभ बच्चन देखील प्रमुख भूमिका  सकारत आहेत"
- अनुराग कश्यप.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
"केवळ टि आर पी कमावणे हा उद्देश ठेऊन मालिका बनत असून कथानकाच्या गरजेनुसार काम करण्याऐवजी कलाकारांच्या उपलब्धतेनुसार किवा निर्मात्यांच्या सांगण्याअनुसार कथानक लिहिलं जात त्यामुळे त्यातली कल्पकता हरवत चालली आहे,हे मला पटणार नसलं तरीही पैस्यांसाठी हे करावं लागतं." 
- अंबर हडप. (मराठी चित्रपट,मालिकांचे लेखक)
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


- श्रीनिवास कुलकर्णी. 










No comments:

Post a Comment