Monday, August 19, 2013

मराठवाड्याचा विकास आणि आव्हाने . . .

मराठवाडा . . .
(The artical written for one Marathi magazine)

मराठवाड्याचा विकास आणि आव्हाने . . .


नुकतच तेलंगानाला वेगळे राज्य म्हणून मान्यता प्राप्त झाल्याची माहिती येते न येते तोच महाराष्ट्रात वेगळा विदर्भ आणि मराठवाडा या चर्चेला उधान आले,पण विदर्भ,मराठवाडा हे प्रदेश महाराष्ट्रातून वेगळे होण्याचा मुद्दा समोर का येतो याचा विचार करण्याची कोणालाच आवश्यकता  वाटत नाही ?
राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर नेहमीप्रमाणे मराठवाड्यासाठी विशेष तरतुदी दिसत नाहीत,महाराष्ट्र निर्मितीपासूनची हि परंपरा राजकीय नेते मंडळी अतिशय नेमाने पळत आलेले आहेत,यावर मराठवाड्यातील प्रतिनिधी मात्र अर्थसंकल्प संतुलित असल्याची प्रतिक्रिया देताना दिसतात त्यामुळे मराठवाड्याच्या मागण्या योग्य प्रमाणात पोहोचत नाहीत  आणि त्याचं गांभीर्य नेते मंडळींना वाटत नाही,ही परिस्थिती बदलण्याची गरज आज निर्माण झाली आहे त्यासाठी पुन्हा एकदा लोकांनी विशेष करून युवापिढीने पुढे येउन मराठवाडा विकास आंदोलन करण्याची गरज आहे,उच्चशिक्षण आणि पायाभूत सुविधा,उद्योगांची (रोजगाराची) कमतरता यामुळे  मराठवाड्यातील असंख्य युवक आज पुणे,मुंबई सारख्या शहराकडे कडे जाताना दिसतात.अनेक पायाभूत सुविधांपासून वंचित राहिलेल्या या भागातील समस्यांचा शोध घेऊन त्या सोडवणे आणि नव्या संधी निर्माण करणे यावर अधिक भर देणे आता गरजेचे आहे.
मागे देशपातळीवर मराठवाड्याचे नेतृत्व करणारे दिवंगत नेते मा.ना.विलसरावजी देशमुख यांनी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री असताना "भेल" हि वीज कंपनी मराठवाड्यातील लातूर येथील औसा भागात आणली होती पण त्यांच्या मृत्यू नंतर ती इतर भागात स्थलांतरित होण्याच्या हालचाली सुरु आहेत,आज या कंपनी मुळे मराठवाड्यातील लाखो तरुणांना रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या असत्या,अनेक पायाभूत सुविधा यामाध्यमातून पोहोचल्या असत्या,पण याबाबत मराठवाड्यातील मंडळी कोठेही तक्रार करताना दिसत नाहीत,या कायम उदासीनतेमुळे कोणतीही नवीन योजना,कॉलेज, शासकीय संस्थान् संदर्भातील योजना विकसित भागाकडे खेचल्या जातात,आणि या पूर्वविकसित भागासाठीच अधिकाधिक निधी खर्च केला जातो आणि याचे कारण विदर्भ मराठवाड्यात मुलभूत सुविधा नाहीत असे दिले जाते,परिणामी मराठवाडा मागासच राहतो.
शासनाने मंजूर केलेल्या "कल्याण"कारी योजनाच नुसत्या लोकांपर्यंत पोहोचतात पण वास्तविक "कल्याण" मात्र  इतर लोकांचे होते,त्यामुळेच आज मराठवाड्याचे दरडोई उत्पन्न आणि मानवविकास निर्देशांक इतर भागांच्या तुलनेत अतिशय कमी आढळतात,त्यामुळे सिंचन, तंत्रशिक्षण, शासकीय नोकऱ्या या साधनांपैकी कशाचेही लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत,मंजूर झालेल्या विविध  योजनांचे पैसे जातात कोठे ? त्याचा लाभ कोणाला होतो ? समाजापर्यंत विकासाचे लाभ का पोहोचू शकले नाहीत ? याचा शोध घेऊन वंचित लोकांचे दरडोई उत्पन्न वाढवणे तसेच सरकारी योजनांचा अधिकधीक फायदा समाजाला कसा होयील यासाठी प्रयत्न करणे महत्वाचे आहे.
मराठवाड्या सारख्या ग्रामीण भागातील अनेक लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे.पण हल्ली सुपीक शेतजमिनींचा वापर औद्योगिक विकास तसेच राहती घरे बांधण्यासाठी होत चालला आहे,विकास घडवत असताना किती प्रमाणात शेतजमिनीचे संपादन करावे, किती संसाधनांचा ऱ्हास होऊ द्यावा आणि किती लोकांचे विस्थापन होऊ द्यावे याबाबत विचार होणे अत्यावशक आहे.शेती हा प्रमुख व्यवसाय मागे पडत चालला आहे,यावर वेळीच योग्य उपाययोजना करण्यात आली नाही तर पुढे वाढत्या लोकसंखेच्या गरजा भागवण्यात आपण असक्षम राहू.यातील अनेक संसाधनांवर विविध गरीब व निम्न मध्यमवर्गीय लोकसमूहांची उपजीविका आधारित असते. त्यामुळे अशा शिल्लक नैसर्गिक संसाधनांना संरक्षण देण्याची आज गरज आहे.
शासनातर्फे मराठवाड्यासारख्या ग्रामीण भागातील मुलांपर्यंत शिक्षण सुविधा मिळण्यासाठी सर्वशिक्षा अभियान राबवले जाते,पण "खिचडी" मुळे होणार्या शारीरिक विकासासोबत मूळ गाभा असणारा बौद्धिक विकास साधण्यासाठी उच्च दर्जाचे शिक्षण,विद्यापीठे,सरकारी महाविद्यालये ग्रामीण भागात आणण्याचा प्रयत्न होत नाही,या उदासीनतेमुळे आपल्याकडील विद्धार्थी आज स्थलांतरित होताना दिसतात.यासोबतच रोजगार हा आज येथील तरुणांचा महत्वाचा प्रश्न आहे,ग्रामीण भागात बेरोजगार तरुणांसाठी विविध योजना शासनातर्फे राबवल्या जातात पण याची पुरेशी माहिती येथील तरुणांना नसते,बदलत्या तंत्रज्ञानानुसार अनेकानेक नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत पण त्याविषयीची माहिती,जागरूकता तरुणांना नसल्याकारणाने  या संधींचा फायदा तरुणांना होत नाही यासाठी विधार्थी मेळावे,चर्चासत्र यांचे आयोजन विविध संस्था,महाविद्यालय तसेच विद्यापीठे यांच्यामार्फत करून यामार्फत तरुणांना रोजगाराच्या संधींची माहिती करून देणे महत्वाचे आहे.
जगात सर्वाधिक दुसर्या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या भारताकडे इतर देशांतर्फे केवळ मोठीबाजारपेठ म्हणून पाहिलं न जाता विज्ञान,विकास,तंत्रज्ञान अश्या अनेक क्षेत्रात प्रगतीची,नवनिर्मितीची जबरदस्त ताकद असलेला देश म्हणून पहिल पाहिजे.यासाठी गरज आहे विकासापासून दूर राहिलेल्या  देशातील असंख्य मराठवाड्यासारख्या ग्रामीण भागातील विकासाची,त्यामुळेच जागतिक महासत्ता बनण्याचं स्वप्न साकारायच असेल तर प्रथम ग्रामीण भागाचा विकास साधने अतिशय महत्वाचे आहे.

- श्रीनिवास कुलकर्णी.

No comments:

Post a Comment