Sunday, June 2, 2013

खो खो चित्रपट परीक्षण . . .


"लोच्या" ला "खो" . . .



लेखक-दिग्दर्शक केदार शिंदे दिग्दर्शित आणि  शोभना देसाई निर्मित ‘खो खो’ हा सिनेमा
रसिकांच्या भेटीला आला आहे.सिनेमा केदारच्याच ‘लोच्या झाला रे’ या नाटकावर बेतलेला आहे.याअगोदर श्रीमंत दामोदर पंत,सही रे सही,लोच्या झाला रे हि नाटकं तर जत्रा, अगंबाई अरेच्चा, गलगले निघाले, ह्य़ांचा काही नेम नाही, इरादा पक्का, ऑन डय़ुटी २४ तास यांसारखे वेगळे विषय हाताळणाऱ्या केदार शिंदे याचं दिग्दर्शन असलेला सिनेमा तब्बल तब्बल तीन वर्षानंतर येतोय.
 पिढीजात वारसा जपण्यासाठी अनेजण प्रयत्नशील असतात पण हाच वारसा जपण्यासाठी एखादी गोष्ट आपल्याकडून होत नसेल तर ते करण्यासाठी पिढीतले सात पूर्वज जमिनीवर पूर्वज जर अवतरले तर ?  नेमका हा विषय खो खो या चित्रपटात मांडण्यात आला आहे.
मुंबईतील एक साध्या सरळ शिक्षक श्रीरंग देशमुख (भरत जाधव) या पात्रा भोवती चित्रपटाची कथा फिरते.शाळेतील सततच्या गैरहजेरीमुळे त्याची बदली त्याच्या मूळ गावी बडवेबुद्रुक येथे होते,तिथे त्याचा पिढीजात वाडा असतो.या वाड्याची देखभाल अण्णा (विजय चव्हाण ) करत असतो.श्रीरंगच्या येण्याने अण्णा आपली मुलगी सुमन (प्राजक्ता माळी) हिच्यासाठी चांगलं स्थळ दारात चालून आलं म्हणून खूश असतो.परंतु गावात आल्यावर श्रीरंगला वेगळ्याच राजकारणाला तोंड द्यावे लागते. एक मोठा बिल्डर मेहता (उदय टिकेकर) आणि तिथला गावगुंड पक्याभाई (कमलाकर सातपुते) रिडेव्हलपिंगच्या नावाखाली अख्खा गावच ताब्यात घेण्याचा डाव खेळत असतो,देशमुखांचा वाडाही त्यांना बळकवायचा असतो.पक्याभायच्या धमकीमुळे श्रीरंग वाडा सोडून जायला तयार होतो.वाडय़ाची आवराअवर करताना त्याला वाडय़ाच्या इतिहासाचं जुनं हस्तलिखित सापडतं, त्यात एका पूर्वजाने लिहिलेला घराण्याचा इतिहास असतो तसेच सात पराक्रमी पूर्वजांची माहितीही त्यात असते. श्रीरंग ते वाचायला घेतो आणि त्याचे आयुष्यच बदलून जाते.श्रीरंगची मदत करण्यासाठी आणि वाडा वाचवण्यासाठी एकामागून एक असे वेगवेगळ्या काळातले आदिमानव (सिद्धार्थ जाधव),अशोककालीन शिपाई (वरद चव्हाण), संत (वरुण उपाध्ये), मावळा (घनश्याम घोरपडे), लावणी नर्तिका (क्रांती रेडेकर), गांधीवादी (आनंदा कारेकर), संयुक्त महाराष्ट्र चळवळीतला कार्यकर्ता (प्रशांत विचारे) हे सात पूर्वज एकमेकांना ‘खो’ देत त्याच्या भेटीला येतात आणि त्यानंतर एकूणच धमाल पडद्यावर पाहायला मिळते.
चित्रपटाची कथा हि रहस्यमय असून त्याला पटकथेत रुपांतरीत करताना अनेक अनावषक प्रसंगांची पेरणी त्यात केलेली दिसते,तर त्यातले काही संवाद,विषय हे अनेक चित्रपटांमधून याअगोदर समोर आले असल्यामुळे त्यात नाविन्य वाटत नाही तर काही ठिकाणी ते बालिश वाटतात .मध्यन्तरापुर्वी वेगाने पुढे सरकणारी कथा उत्तरार्धात काहीशी मंदावते.भारत जाधवचा अभिनय चांगला झाला असला तरी चित्रपट पाहताना त्याच्या पूर्वीच्या भूमिकांची आठवण येत राहते.सिद्धार्थने  नाटकातील याच आदिमानवाच्या भूमिकेसाठी अभिनयाचे पारितोषिक मिळवले होते,चित्रपटात देखील त्याची तशीच धमाल पाहायला मिळते.नायिका प्राजक्ता माळी तसेच इतर सर्व कलाकारांनी आपल्या वाट्याला आलेल्या भूमिका चोख पार पडल्या आहेत.चित्रपटातील गीते कथेला पूरक असून त्यांच लेखन ओमकार दत्त व वैभव जोशी यांनी केल आहे तर संगीत शशांक पोवार व वैशाली सामंत यांच असून चित्रपटातील 'गोंधळ' आणि उषा उत्थुपचं 'लाइफ इज खो.. खो..' हे गाणं विशेष श्रवणीय झाल आहे.कथानकाला साजेसा वाडा, वाड्याचं गूढपण अधोरेखित करण्यासाठी वापरेली प्रकाश योजना यामुळे पूर्वजांसोबतचा श्रीरंगचा गोंधळ पडद्यावर देखणा होतो त्यामुळे सुधाकर मांजरेकरांच्या कला दिग्दर्शनाचं विशेष कौतुक करावं लागेल,मनीष मिस्त्री यांनी संकलन आणि सुरेश देशमाने यांच छायांकन देखील चांगल झाल आहे.दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आजवर असे अनेक विषय हाताळले असले तरी रेगाळलेल्या कथेमुळे दिग्दर्शन सैल पडते,तसेच चित्रपटाच्या उत्तरार्धात अनेक ठिकाणी तंत्रज्ञानाचा अभाव जाणवतो.
एकंदरीत उत्तम अभिनय,चांगले सादरीकरण आणि वेगळा विषय यामुळे चित्रपट चांगला झाला असला तरीदेखील नाटकाइतका परिणाम साधण्यात चित्रपट अयशस्वी होतो.त्यामुळे "खो खो" चा लोच्या झाला रे असेच  म्हणावे लागेल. तरी केदार-भरत-सिद्धार्थ या त्रिकुटाला पाहण्यासाठी आणि "लोच्या" चा प्रयोग  न पाहिलेल्यानि एकदा हा चित्रपट पाहायला हरकत नाही.
स्टार रेटिंग -  3/५

- श्रीनिवास कुलकर्णी.

No comments:

Post a Comment