Monday, October 14, 2013

धड देव्हार्यात अन . . .

धड देव्हार्यात अन . . .  



आरश्यामध्ये चेहरा व्यास्थित असल्याचा अंदाज घेत त्यानं नुकतीच विकत घेतलेली चप्पल पायात सरकवली आणि तो घरातून मंदिराकडे जाण्यास निघाला.मंदिरात व्यास महाराजांच्या श्रीमद भागवत कथेचे कथेचे आयोजन केले होते.त्यामुळे पुढील सात दिवस वेळ अगदी सहज जाणार या भावनेन त्याचा मन सुखावत होतं,नुकताच तो सेवानिवृत्त झाला होता,दिवसभर काम करायचं सायंकाळी घर गाठायचं हे त्याचं गेल्या कित्येक वर्षांचं गणित यामुळे कोलमडल होत त्यामुळे दिवसभर स्वतःला कश्यात तरी तो रमवत असे.काही अंतर गेल्यानंतर मंदिर आले,मंदिराबाहेर कोपर्यात त्याने चप्पल उतरवली,मूर्तीला पाहून त्याने नमस्कार केला आणि कथा ऐकण्यास जाऊन बसला.दिवसभर कथा ऐकल्यानंतर पुन्हा मूर्तीजवळ येउन त्यानं श्रद्धेने हात जोडले.आणि चप्पल घालण्यासाठी तो चप्पल ठेवलेल्या कोपर्याजवळ पाहतो तर काय चप्पल गायब . . . तो प्रचंड अस्वस्थ झाला,जवळपासचा परिसर बर्याच वेळ निहाळला; मात्र चप्पल काही सापडली नाही.
आत्ताच तर घेतली होती . . .
आता पुन्हा भुर्दंड . . .
नेणार्याला काहीच कसे वाटत नसेल . . . मनातल्या मनात शिव्या देत तो जवळच कट्ट्यावर बसून राहिला . . . समोर अनेक चपला दिसत होत्या . . .
त्यातली एखादी घालून जावी  का ?
नाही . . .
नको मग त्या नेणाऱ्या मद्धे आणि आपल्या मद्धे काय फरक ?
आणि आपण स्वतःच दु:ख इतरांवर ढकलतो आहोत एवढच . . .
नाही हा विचारही मनात आणू नये . . .
लोक म्हणतात शाप्पाल गेली म्हणजे साडेसाती जाते . . . पण खरतर नवीन चापलीसाठी खर्च होतो म्हणजे साडेसाती येते. 

संध्याकाळी  दुकानात जाऊन  नवीन चप्पल खरेदी केली.घरी येउन जेवन  केलं आणि पलंगावर अडवा पडून विचार करू लागला . . . नेणाऱ्याला पण नेमकी माझीच चप्पल कशी दिसली असेल ? जरा नवी दिसली की घातली पायात.नवी चप्पल मिळाली म्हणून आनंदात असेल आता,लोकांनी खरं  लाजच सोडली आहे.चप्पल चोरावी ? काय हे दरिद्री लक्षण ?
उद्यापासून आता मंदिरात जाताना चप्पलच घालायची नाही . . . असे असंख्य विचार बराच वेळ त्याच्या मनामद्धे घोळत होते.

दुसर्यादिवशी तो पायात चप्पल न घालताच कथा ऐकण्यास गेला,व्यास महाराज आज जरासंधाचा वध हि कथा सांगत होते
"भीम हा वारंवार जरासंधाच्या शरीराचे दोन तुकडे करून फेकत असे ,पण हे दोन्ही भाग एकत्र येउन पुन्हा जरासंध जिवंत होत होता,शेवटी कृष्णाने एक गवताची कडी हातात घेतली ती मधोमध चिरली आणि विरुद्ध दिशेला टाकली,समझनेवालोको इशारा काफी . . . लगेचच भीमाने जरासंधाचे दोन्ही पाय धरून,पायाकडून ताकदीने चिरून दोन्ही तुकडे विरूद्ध दिशेला फेकून दिले आणि जरासंधाचा वध झाला".
आजची कथा संपली तो घरी जाण्यास निघाला काहीतरी सुचल्याने  त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता,
नेहमीप्रमाणे त्याने जेवण आटोपले झोपी गेला.

दुसर्यादिवशी पायामध्ये चप्पल घालून तो मंदिराच्या दिशेने निघाला. 
मंदिराजवळ कालच्या जरासंधाच्या कथेत घेतलेल्या बोधानुसार एक चप्पल एका बाजूला आणि दुसरी विरुद्ध बाजूला टाकली
आणि निर्धास्त पणे कथा ऐकण्यास बसला.
काही वेळाने कथा संपली मूर्तीला त्याने नमस्कार केला आणि मंदिरातून बाहेर पडला.विरुद्ध बाजूला पडलेल्या चपला पायात घातल्या पुन्हा एकदा मंदिरातील मूर्तीकडे पाहिलं,त्याच्या चेहऱ्यावर चोराला फसवल्याचा आनंद दिसत होत, आणि मस्त शीळ वाजवत तो तिथून बाहेर पडला... पूर्ण समाधानाने!  

- श्रीनिवास कुलकर्णी. 

No comments:

Post a Comment